test

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाची 35वी वार्षिक तपासणी दिन परेड 25 फेब्रुवारी 2023 रोजी सांत-इनेज, पणजी – गोवा येथील गोवा अग्निशामक दल प्रशिक्षण मैदानावर झाली. वार्षिक तपासणी दिन परेड हा आपत्कालीन घटनेच्या प्रसंगी त्वरित प्रतिसादासाठी अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांच्या ऑपरेशनल फिटनेसचा स्तर तपासण्यासाठीचा वार्षिक कार्यक्रम आहे. ड्रील स्पर्धेच्या विजेत्यांना व वार्षिक क्रीडा मेळाव्याच्या विजेत्यांना प्रमाणपत्रे व ट्रोफी देण्यात आल्या. या कार्यक्रमाला गोवा सरकारचे मुख्य सचिव डॉ. पुनीत कुमार गोयल, आय.ए.एस. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सौ. स्नेहा गीते, विशेष सचिव (गृह), ड़ॉ. पी. के. जॉन (डीएफईएसचे संस्थापक संचालक) यांचीही यावेळी उपस्थिती होती. 

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी सुरुवातीला स. 7.30 वा. वार्षिक परेडची तपासणी केली आणि विविध श्रेणींमधील सर्वोत्कृष्ट अग्निसेवा कर्मचार्‍यांची सर्वोत्कृष्ट टर्न आऊट पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. स्कॉड ड्रील, लॅडर ड्रील यासाठी अग्निसेवा दल मुख्यालयाला प्रथम बक्षीस प्राप्त झाले, तर पंप ड्रीलचे प्रथम बक्षीस अग्निसेवा दल मुख्यालयाला आणि टग ऑफ वॉरचे फोंडा फायर स्टेशनला प्राप्त झाले. स्टेशन फायर अधिकारी श्री. संतोष गांवस, उप-अधिकारी श्री. राजेश तलवार, प्रमुख फायर फायटर श्री. संतोष आर. गांवकर, वॉचरूम ऑपरेटर श्री. सीताराम एल. कामत, ड्रायव्हर ऑपरेटर श्री. अशोक व्ही. नाईक व श्री. दामोदर टी. नाईक, फायर फायटर्स श्री. सिद्धेश वारंग, श्री. जयराम मुळगांवकर, श्री. योगेश्वर जी. पाटील व श्री. जितेंद्र व्ही. नाईक यांना सर्वोत्कृष्ट टर्न आऊट पुरस्कार देण्यात आले. स्टेशन फायर अधिकारी श्री. दामोदर जांबावलीकर यांच्या प्लॅटून क्र. 10 ला सर्वोत्कृष्ट प्लॅटून पुरस्कार देण्यात आला. 10 व्या वार्षिक क्रीडा मेळाव्याचे क्रिकेटमधील विजेतेपद केंद्रीय विभागाला, फुटबॉलमधील विजेतेपद उत्तर विभागाला व व्हॉलीबॉलमधील विजेतेपद केंद्रीय विभागाला प्राप्त झाले.  

अग्निशमन व आपत्कालीन सेवेचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की वार्षिक तपासणी परेड हा खात्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे ज्यात संचालनालयातर्फे मासिक परेडची आरोग्यदायी परंपरा राखली जाते ज्यामुळे फिल्डवरील कर्मचारी ऑपरेशनली फिट व टर्न आऊट राहतात. वार्षिक तपासणी परेड ही या प्रयत्नांची अंतिम पायरी आहे आणि यावेळी देण्यात आलेल्या बक्षीसांचा कामगिरीची मानके सुधारण्यावर प्रभाव पडतो.   
त्यांनी पुढे सांगितले की, महिलांना अग्निशमन सेवा खात्यात सामावून घेण्याची दीर्घकालीन प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. गोवा अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच खात्यातर्फे 01 महिला उप-अधिकारी व 03 महिला फायर फायटर्स यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या सध्या पणजी येथील गोवा राज्य अग्निशामक दलाच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात सर्वसामान्य अग्निशमनमधील प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. भारत सरकारद्वारे आदर्श विधेयक 2019 ची शिफारस करण्यात आली आहे, जेणेकरून संपूर्ण देशात समानता राहील. खात्याने सरकारला विधेयक संमत करण्याचा प्रस्ताव दिला होता, आणि प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. 
गोवा सरकारचे मुख्य सचिव श्री. पुनित कुमार गोयल आय.ए.एस यांनीवाहन ट्रॅकिंग व व्यवस्थापन प्रणालीचे (जीपीएस) उद्घाटन केले, ज्यामुळे राज्यभरातील आगीच्या व आपत्कालीन घटनांच्या वेळीची प्रतिसाद यंत्रणा सुधारली आहे. आपल्या भाषणात त्यांनी मार्च पास्ट, लॅडर ड्रील यांच्या कामगिरीचे व क्रीडा कार्यक्रमांच्या विजेत्यांचे कौतुकही केले. पुढे त्यांनी गेल्या तीन वर्षांतील आगीच्या व आपत्कालीन घटना हाताळण्यातील खात्याच्या त्वरित व प्रभावशाली प्रतिसादाच्या कामगिरीची प्रशंसा केली.  

अग्निशामक दल मुख्यालयाच्या अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांनी लॅडर ड्रील कार्यक्रम प्रदर्शित केला जो 01.45 मिनिटांच्या वेळात उत्कृष्टपणे सादर करण्यात आला. श्रीमती वर्षा मळिक चंदगडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि सहायक विभागीय अधिकारी, उत्तर विभाग श्री. अजित कामत यांनी आभार मानले.
 

Marathi

test